बेळगाव : मराठी शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली बेळगाव येथे झालेल्या रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. दि. 2 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बार असोसिएशन बेळगावचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. दीपक किल्लेकर तसेच श्री. रवी नाईक, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विश्वजीत हसबे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. के. आर. कडोलकर यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी रांगोळी व चित्रकला स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्याना, माजी विद्यार्थ्यातर्फे पुस्तक रुपी भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्रमुख अतिथी ॲड. सुधीर चव्हाण यांनी स्पर्धेमध्ये यश मिळवणे जितके महत्वाचे तितकेच स्पर्धेमध्ये भाग घेणेही महत्त्वाचे आहे व यश न मिळालं तर खचून न जाता जोमाने तयारी करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
तसेच श्री. दीपक किल्लेकर, श्री. विश्वजीत हसबे व श्री. रवी नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व विजयी स्पर्धकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी शिक्षिका कल्याणी घोडके व श्रद्धा ओगले यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक वृंद, प्रशिक्षणार्थी शिक्षिका व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता श्री. प्रशांत पोवार यांनी उपस्थितांचे आभार मानून केली.