
(२)
बेळगाव : सीमाभागात आता प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा राजकीय पाडाव करून आसुरी आनंद मिळविणाऱ्या कर्नाटक सरकारने आता सीमाभागात पुन्हा एकदा कन्नडसक्तीचा वरवंटा फिरवला आहे. १९८६ साली ज्या अन्यायकारक नियमांची सुरुवात झाली त्याचा कळस गाठण्याचे काम सध्या सुरू असल्याची प्रचिती सीमाभागातील मराठी जनतेला येत आहे. लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून कर्नाटकातील कन्नड भाषिकांना खुश करण्यासाठी सीमाभागातील मराठी जनतेला जमेल तेवढा त्रास देवून त्यांचा भाषिक छळ करण्याचा प्रकार कर्नाटक सरकार करत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
सीमाभागात १९८६ साली शालेय शिक्षणात कन्नडसक्ती करून त्यांनी इथल्या नवीन पिढीचे अतोनात नुकसान केले ज्यांची फळे आजही मराठी माणूस भोगतोय. शालेय शिक्षणात कन्नड भाषा शिकून सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण झालेल्या मुलांना आजही या राज्यात नोकरीसाठी वणवण भटकावे लागते, सरकारी नोकरीमध्ये तर दुरान्वयेही संधी मिळत नाही. तेवढे कमी की काय कागदपत्रे कन्नड करण्यात आली. सीमाभागातील मराठी भाषेत चालणारे व्यवहार सुद्धा कन्नडमध्ये करण्यात आले आणि हळूहळू मराठीला मारण्याचे काम कर्नाटक सरकार करत आले. सध्या या सगळ्याचा कहर म्हणजे सीमाभागातील खासगी व्यवसाय करण्याऱ्या लोकांवर देखील कन्नडसक्ती करण्यासाठी कायदा आणून मराठीचे अस्तित्व संपविण्याचा कट कर्नाटक सरकारने रचला आहे. या नवीन कायद्याने सर्व खासगी व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय फलकावर ६०% कानडी भाषेत लिहणे अनिवार्य केले असून सोबत या कायद्यामधील अनेक अटी या मराठी भाषा आणि मराठी माणसाला उध्वस्त करण्यासाठी योजील्या आहेत असेच दिसते. सीमाभागात व्यवसाय हा चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच गोव्यातून येणाऱ्या लोकांवर जास्त अवलंबून आहे आणि इथले व्यावसायिक सुद्धा मराठी आहेत म्हणून त्यांचे फलक हे मराठीत आहेत पण कर्नाटक सरकारची वक्रदृष्टी यावर पडल्याने भलेही इथला मराठी व्यावसायिक उध्वस्त झाला तरी बेहत्तर पण कानडी भाषेत फलक लावण्याची धमकी आता कर्नाटक सरकार देत आहे. जेणेकरून इथले वरकरणी दिसणारे मराठीचे ठळक अस्तित्व संपुष्टात येईल.
हे कमी होते की काय कर्नाटक सरकारला जय महाराष्ट्र या शब्दाची सुद्धा कावीळ झाली आहे. चार-पाच उपटसुंभ लोकांनी हट्ट धरला आणि लगेच सरकारी कर्मचाऱ्यांनी अनगोळ येथील “जय महाराष्ट्र” फलक उतरविला. जय महाराष्ट्र म्हणायचे असेल तर महाराष्ट्रात जा म्हणून हे बाहेरून येवून बेळगावच्या मराठी माणसाला धमकवित आहेत हे निषेधार्थ आहे. सीमाभाग संबंधी सर्वोच्च न्यालयाय खटला दाखल असताना देखील ही अरेरावी राजरोजपणे सरकार आणि कानडी म्होरक्यांकडून सुरू असताना मराठी माणूस मात्र पार अस्वस्थ आणि उद्विग्नवस्थेत आहे. कारण हा सगळा अन्याय जसा सरकार आणि बाहेरून आलेल्या कानडी लोकांकडून सुरू आहे. त्याच्यावर मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारच्या छुप्या मराठी दलालांमुळे वाढत आहे. वरकरणी हे मराठी असले तरी मूळ मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाचे मारेकरी हेच लोक आहेत. सरकारकडून केली जाणारी अडवणूक एक वेळ बाजूला ठेवली तरी हे मराठीचे कातडे ओढून घेतलेली मंडळी सुद्धा सरकारची मर्जी सांभाळण्यासाठी मराठी भाषेचा गळा घोटतात फक्त आणि फक्त आपली दुकानदारी चालविण्यासाठी.
काल आनंदवाडीतील कुस्ती आखाड्यात एक प्रकार पाहिला. ज्या मराठी लोकांमुळे श्रीकांत देसाई मोठा झाला त्याच मराठी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम त्याने केलं. जय महाराष्ट्र म्हटल्याने याची उंची कमी होते म्हणत त्याने मराठी लोकांचा आणि सिमालढ्याचा जाहीर अपमान केला. कर्नाटकी राजकारण्यांची मर्जी सांभाळून स्वतःच्या तुमड्या भरून घेणाऱ्या लोकांना आता मराठी माणसाने धडा शिकवला पाहिजे. एवढीच गुलामी आवडत होती तर का बांधली महाराष्ट्र हद्दीत व्यावसायिक इमारत? महाराष्ट्राच्या भूमीत व्यवसाय थाटून जय महाराष्ट्र म्हणायला कमीपणा वाटणाऱ्या अश्या दळभद्री लोकांना महाराष्ट्र सरकारकडून आणि जनतेकडून देखील अद्दल घडवली पाहिजे. हे आहेत मराठीचे मारेकरी.
तरी त्या प्रकारानंतर ज्याचे रक्त उसळणार नाही तो कसला मराठी?? मातृभूमीचा, मातृभाषेचा अपमान होताना आपल्या स्वार्थासाठी गप्प बसणारा कधीच मराठी असू शकत नाही आणि म्हणूनच आर. एम. चौगुले, दत्ता जाधव, सागर पाटील, गजानन पवार यांच्यासह स्वाभिमानी मराठी लोकांनी थेट जाब विचारण्याचे काम केले ते खरे मराठी आहेत. कारण इतक्या लाजिरवाण्या घटनेनंतर देखील जो स्वस्थ बसला तो खरा मराठीचा मारेकरी असतो.
मराठी लोकांनी आता या सगळ्यातून बोध घेतला पाहिजे आणि लढल्याची तीव्रता कायदेशीर मार्गाने वाढविली पाहिजे. नाहीतर एक वेळ अशी येईल की इथे निमित्ताला देखील मराठी दिसणार नाही आणि त्यावेळी आज जो गप्प राहिला त्याला काळ माफ करणार नाही..
“जय महाराष्ट्र”
Belgaum Varta Belgaum Varta