बेळगाव : भरधाव मोटारसायकल दुभाजकाला आदळून मोटारसायकलवरून खाली पडल्याने दोघा जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री पहिल्या रेल्वेगेटजवळ ही घटना घडली असून शनिवारी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
ऍड. अभिषेक मुत्ताप्पा कित्तूर (वय ३२) रा. राणी चन्नम्मानगर व किरण रमेश अळगुंडी (वय २३) रा. गोकाक अशी मृतांची नावे आहेत. अभिषेक हे एका खासगी कंपनीचे कायदा सल्लागार होते. तर किरण हा घटप्रभा येथील एका कॉलेजमध्ये बी. फार्मसीचे शिक्षण घेत होता.
अभिषेक यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन., पोलीस निरीक्षक जगदेवप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
शनिवारी दोन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार घटप्रभा येथे बी. फार्मसीचे शिक्षण घेणारा किरण हा मोटारसायकलवरून खानापूरच्या दिशेने जात होता. तिसऱ्या रेल्वेगेटजवळ पेट्रोल संपल्यामुळे त्याने आपली मोटारसायकल तेथेच उभी केली. याच मार्गावरून घरी निघालेल्या अभिषेक यांना थांबवून त्याने मदत मागितली.
अभिषेक यांच्या मोटारसायकल- वरून हे दोघे पेटोल आणण्यासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. या अपघातात अभिषेक व किरण दोघेही जागीच ठार झाले. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत. खासगी कंपनीतील कायदा सल्लागार व विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.