बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची मानल्या दहावीच्या परीक्षेला सोमवार (ता. २५) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण केली असून रविवारी विविध परीक्षा केंद्रांवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक घालण्याचे काम पूर्ण केले जाणार असून रंगपंचमी दिवशी दहावीचा पहिला पेपर पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर रंग किंवा पाणी टाकू नये, असे मत व्यक्त होत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ९६ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडणार आहे तसेच ३५११८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ४६६०६ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील २५८ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार असून परीक्षेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे; तसेच शनिवारी दुपारपासून परीक्षा केंद्रांवर क्रमांक घालण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पंधरा मिनिटे अगोदर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे तसेच सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे याचबरोबर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार असून दुपारच्या सत्रात पाचवी आठवी व नववीचा पेपर पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची वर्दळ पाहावयास मिळणार आहे.
दहावी परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
२५ मार्च : मराठी (प्रथम भाषा)
२७ मार्च : समाज विज्ञान
३० मार्च : विज्ञान
२ एप्रिल : गणित
४ एप्रिल : कन्नड, इंग्रजी (तृतीय भाषा)
६ एप्रिल : इंग्रजी, कन्नड (द्वितीय भाषा)