निपाणी (वार्ता) : संपूर्ण कर्जमाफीसह घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या अधिकाऱ्यांना त्वरित थांबवावे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला नाही. असे असताना कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांकडे आर्थिक संस्थांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. बँकांसह फायनान्सकडून कर्जवसुलीसाठी नोटीस दिल्या जात आहेत. याशिवाय वाहने जप्त करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज भरणे अशक्य आहे. तरी देखील आर्थिक संस्थांकडून कर्जवसुलीचा तगादा सुरूच आहे. कर्जवसुली त्वरित थांबविण्यात यावी. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या मागणीसाठी कन्नड साहित्य भवन येथून जिल्हा प्रशासनावर मोर्चाकाढण्यात आला.
कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अडवून धरले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व स्वामींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चामध्ये सुरेश परगन्नावर, शशिकांत पडसलगी, प्रकाश नाईक, शिवाजी वाडेकर, तानाजी पाटील, मारुती लाड, मधुकर पाटील, मल्लाप्पा अंगडी, मयूर पोवार, बसवराज बिज्जूर, श्रीशैल आंगडी, वासू पंढरोळी, सुरेश वाली, शिरगुर स्वामी, महांतेश भुतवाड, शिवलिंगाप्पा बिरादार -पाटील, किसन नंदी, तमन्ना पाटील, दशरथ नाईक, प्रकाश पुजारी, इराण्णा ससालट्टे, उमेश गोवनकोप्प रमिजा फक्तुनायकर, सुनिता रेवणावर यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.