बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दि.23 एप्रिल दिवशी ‘पुस्तक दिवस’ साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे तरुणपिढी मोबाईलकडे वळली असल्याने ते वाचनालयाकडे वळत नाहीत, एवढेच नव्हे तर कार्यक्रमातही तरुणांची उपस्थिती अभावाने जाणवते. पण शिक्षक व प्राध्यापकांची निरीक्षणे याबाबतीत वेगळी आहेत. बरेचसे विद्यार्थी वाचन करतात, जाणकारीने वाचतात, त्यांना साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम आवडतात, शिवाय विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ते भरपूर वाचन करतात, त्यामुळे पुस्तक दिनाच्या निमित्ताने या साऱ्याचा सकारात्मक मागोवा घेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व प्राध्यापकही भाग घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड (9945015364) किंवा सार्वजनिक वाचनालयचे व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर यांना ( 0831 2461475) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे