बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार रोड शो द्वारे निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. येथील समादेवी गल्ली येथून निघालेला रोड शो खडेबाजार, शनिवार खुट, काकतीवेस रोड, राणी चन्नम्मा सर्कल मार्गे पुढे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या बाजूने जोरदार घोषणाबाजी केली. लोककला पथकांच्या सादरीकरणाने लक्ष वेधून घेतले.
मिरवणीत ढोलताशा, वारकरी मंडळे, अबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते. भाजपच्या टोप्या, भाजपचे झेंडे, भाजपाची शाल घालून महिला आणि कार्यकर्ते मोठया असंख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोदींच्या नावाचा जयघोष करण्यात आला. विविध भागांतून आलेले कार्यकर्ते लोक वाद्यांच्या तालावर थिरकत होते. मिरवणुकीत भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांनी लक्ष वेधून घेतले.
भाजप संसदीय मंडळाचे सदस्य बीएस येडियुरप्पा, गोव्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार भालचंद्र जारकीहोळी, अभय पाटील, दुर्योधन ऐहोळे, महांतेश कवटगीमठ, प्रभाकर कोरे आदी उपस्थित होते. ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार अभय पाटील, भालचंद्र जारकीहोळी आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी बेळगाव लोकसभा भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर विजयी होतील. मोठ्या संख्येने आलेले लोक बघितले तर शेट्टर 2 लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, अब की बार चारसौ पर करण्यासाठी बेळगावची लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली पाहिजे. केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन व्हायला हवे. कर्नाटकातही डबल इंजिनचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.
भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की, जगदीश शेट्टर यांनी विरोधकांना आधीच उत्तर दिले आहे, जगदीश शेट्टर हे जास्तीत जास्त मतांनी विजयी होतील. एकंदर भव्य शक्तिप्रदर्शन करीत बेळगाव भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.