बेळगाव : बेळगाव शहरात अनेक आर्थिक संस्था कमी वेळेत नावारूपास आल्या आणि त्याचप्रमाणे आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांवरून चर्चेत देखील राहिल्या. अशीच चर्चा सध्या बेळगाव शहरातील बहुजनांची संस्था म्हणून सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बँकेबाबत चर्चिली जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली आणि बहुजनांची को-ऑप. बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकेत “नोकर भरती” घोटाळ्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने कालपासून चौकशी सुरू केली असल्याचे समजते. बहुजनांच्या पैशावर उभारलेल्या या आर्थिक संस्थेच्या अनेक गैरकारभाराविरुद्ध नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. काही भागधारकांच्या ठेवी देखील परत देण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा भागधारकातून होत आहे. सध्या या बहुजनांच्या आर्थिक संस्थेने नोकर भरतीत मोठा घोटाळा केल्याची कुणकुण लागल्यामुळे दोन दिवसापासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्यालयात येऊन काही कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते. बहुजनांची तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आर्थिक संस्थेचा घोटाळा बेळगावातील बहुजनांना तारणार की मारणार याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे.