बेळगाव : भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या “त्या’ बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप सातत्याने समोर येत आहेत. खास करून नोकर भरती प्रकरणातील घोटाळा हा आता सीबीआयच्या दरबारात पोहोचला आहे. ‘त्या” बँकेच्या उपाध्यक्षांनी या भरती प्रकरणाची चौकशी करण्यासंबंधी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये नोकर भरती करून घेताना संचालकांच्या व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरी दिल्याचे नमूद केले आहे. तसेच आठ कर्मचारी हे टेम्पररी घेण्यात आले असून या भरती प्रकरणातील उमेदवारांकडून 20 ते 25 लाखांची लाच दिग्गुभाई आणि बाळूमामा यांनी उकळलेली आहे. हा सर्व प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर बँकेच्या नूतनीकरण करण्यासंदर्भात वायफळ खर्च करण्यात आला व त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार दिग्गुभाई आणि बाळूमामांनी केल्याचे समजले आहे.
2014 साली बँकेत नोकर भरती करण्यासाठी वृत्तपत्रातून जाहिराती देण्यात आल्या होत्या. सदर जाहिरातीमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. तरी देखील बँकेत भरती करून घेताना चक्क दहावी पास कर्मचाऱ्यांची भरती करून घेण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हे प्रकरण इथेच न थांबता या दहावी पास कर्मचाऱ्यांपैकी एकाकडून दिग्गुभाईने दोन लाख रुपयांची लाच घेवून बढती देखील दिली आहे. ज्यांना बँकिंग क्षेत्रातला कणभरही अवगत नाही अश्या लोकांना नोकरी दिली गेली. हा सर्व प्रकार जेव्हा बँकेच्या उपाध्यक्षांना आणि संचालकांना निदर्शनास आला तेव्हा तातडीची बैठक बोलावण्यात आली तेव्हा समाधानकारक उत्तर न देता अध्यक्षाने बैठकीतून पळ काढला. एकंदरीत आता सीबीआय चौकशी होणार असल्याने “त्या” कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे याची दाट शक्यता असू शकते. “बेळगाव वार्ता”च्या हाती सीबीआयकडे केलेल्या तक्रारीची प्रत आली आहे. लवकरच “त्या” बँकेचे नाव जाहीर करण्यात येईल.
दिग्गुभाईचे सॉलिड शेअर होल्डर जोमात जुने शेअर होल्डर कोमात ( क्रमशः)