बेळगाव : गणेशोत्सवानंतर पीओपीच्या गणेश मूर्त्या नद्यामध्ये विसर्जित केल्या जातात त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. पीओपी मूर्तींसाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंग हे जलचर प्राण्यांना आणि पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारे आहेत. पीओपीच्या वापरामुळे निसर्ग संपत्तीची आणि पर्यावरणाची हानी होत आहे त्यामुळे बेळगाव जिल्हा पीओपी मूर्ती उत्पादन, विक्री, वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आणली आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशातून बेळगाव शहराला सूट देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
बेळगाव शहर आणि उपनगरात गणेशोत्सव काळात महानगरपालिकेकडून कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येते. बेळगाव परिसरातील गणेश भक्त तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणपती विसर्जनासाठी त्या कृत्रिम तलावाचा वापर करतात. त्यामुळे पीओपी मूर्तींचा जलप्रदूषण आणि पर्यावरण प्रदूषण इत्यादी बाबीवर कोणताही परिणाम होत नाही. गेल्या अनेक दशकांपासून महानगरपालिकेकडून कृत्रिम जलाशय निर्मिती केली जाते. त्याचाच वापर बेळगावातील गणेश भक्तांकडून विसर्जनासाठी केला जातो. राज्य सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वामधून बेळगाव आणि उपनगरास सूट देण्यात यावी. बेळगावच्या आगामी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत ठोस बैठक घेण्यासाठी संबंधित विभाग आणि गणेश महामंडळांसोबत सामूहिक बैठक बोलविण्यात यावी, अशी विनंती मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ प्रशासनाला योग्य ते सहकार्य करेल व उत्सव सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देखील यावेळी देण्यात आली.
यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष सतीश गोरगोंडा, रमेश कळसन्नावर, पीआरओ विकास कलघटगी, सरचिटणीस आनंद आपटेकर, अनंत पाटील आदी उपस्थित होते.