बेळगाव : बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. लाडक्या बाप्पाचे जल्लोषी स्वागत करून दहा दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आता मंगळवारी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस खात्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणूक दुसर्या दिवशी दुपारपर्यंत चालते. मिरवणुकीत शहर परिसरातील साडेतीनशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात. विसर्जन बंदोबस्तासाठी तब्बल तीन हजार पोलिसांचा फौजफाट तैनात असणार आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आल्या असून विसर्जनासाठी कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ तलाव सज्ज झाले आहेत.
शहरातील प्रमुख तलावासह गणेशमूर्तीचे वडगाव, शहापूर, टिळकवाडी, भाग्यनगर, अनगोळ येथे निर्माण केलेल्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहर परिसरातील बहुतांश मंडळाच्या गणेश मूर्ती कपिलेश्वर आणि कपिलतीर्थ तलावात विसर्जनासाठी आणल्या जातात. त्यामुळे विसर्जन मार्गाची डागडुजी करण्यासह धोकादायक फांद्या हटविण्याबरोबर वीजवाहिन्यांचे अडथळे दूर करण्यात आले आहेत. मंगळवारी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक दुसर्या दिवशी दुपारपर्यंत चालते. त्यामुळे बंदोबस्ताची मोठी जबाबदारी पोलिस खात्यावर आहे. त्यामुळे पोलिस खात्याकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.
मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, एकूण 517 कॅमेर्यांची नजर शहर आणि परिसरावर असणार आहेत. ठिकठिकाणी पोलिसांनी पथसंचलन केले. महापालिकेच्या वतीने विसर्जन मार्गावर पथदीपांची सोय करण्यासह विसर्जन तलावावर क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
सायंकाळी चार वाजता मिरवणुकीला प्रारंभ
हुतात्मा चौक येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह आजी माजी खासदार व आमदार तसेच वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत पहिल्या श्रीमूर्तीचे पूजन होईल. यानंतर पारंपरिक मार्गावरून मिरवणूक पुढे मार्गस्थ होईल. हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, जत्ती मठ, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, शनिमंदिर मार्गे कपिलेश्वर तलाव येथे मिरवणुकीची सांगता होईल.