बेळगाव : चलवेनहट्टीसह हंदिगनूर, अगसगे, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी केदनूर, कुरीहाळ, बोडकेनट्टी आदी भागातील भात मळण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
यंदा भात पिकाला पुरक असा पावसाळा झाल्याने भात पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. रोप लागवडीच्या सुरवातीच्या काळापासूनच पावसाने चांगली कामगिरी केली. परिणामी बटाटा आणि सोयाबीन पीक वगळता भात पिकासह इतर पिकांना फायदा झाला आहे.
पावसाने आपला मुक्काम लांबविल्याने शेतकऱ्यांची कामं खोळंबून होती त्यामुळे बहुतांश ठिकाणी सुगीला एकदम सुरुवात झाल्याने मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. पुर्वी पुरुष मंडळीच्या सहायाने रात्रीच्या मळण्या करत होते त्यात अलिकडील दहा वर्षांत बदल झाला असून महिलांच्या मदतीने मळण्या करण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. महिलांचे काम पुरुष मंडळी पेक्षा अगदी चोख व नीटनेटकेपणाने असल्याने मळणी करण्याच्या कामात महिला अग्रभागी दिसत आहेत.
भात पिकांचे उत्पादन वाढल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे सरकारने योग्य आसा दर निश्चित करावा अशी मागणी ही शेतकऱ्यांतून होत आहे.