सौंदत्ती : बुधवार दिनांक 12 रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भावीक डोंगराकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी सकाळी जोगणभावी परिसराची पाहणी केली असता, तेथील बकाल परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हैराण झाले. त्यांनी तेथील बेहाल परिस्थितीबाबत शिरशिंगी ट्रस्ट सदस्यांना चांगलेच धारेवर धरले.
बुधवारी ही रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा संपन्न होत असताना, आत्तापासूनच लाखोच्या संख्येने भावीक डोंगरावर दाखल झाले आहेत. डोंगर चढण्यापूर्वी सर्व भाविक जोगनभावी येथे स्नान करत असतात. याच ठिकाणी निंब नेसण्याचा विधी होत असतो. या ठिकाणी असलेल्या श्री सत्यवती मातेचे दर्शन घेत असतात. यामुळे जोगनभावी परिसरातही भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.
यावर्षीही भरत पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोगनभावी परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. यात्रा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शुक्रवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह जोगनभावी परिसराला भेट दिली. त्यावेळी जागोजागी अस्वच्छता, बेहाल पार्किंग, बंद असलेले शोवर, कुंडातील अस्वच्छ पाणी हे पाहून जिल्हाधिकारी रोशन हैराण झाले. त्यांनी यासंदर्भात जोगनभावी परिसरात असलेल्या ट्रस्ट सदस्यांना चांगलेच धारेवर धरले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या गर्दीची योग्य ती दखल घेत पुरेपूर व्यवस्था करा असे सक्त आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.