नदिया : पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्याच्या कल्याणीमध्ये एका फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या भीषण स्फोटात ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झाल्यानंतर होरपळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटातील जखमींवर जवाहरलाल नेहरू मेमोरियल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नादिया कल्याणीजवळ रथतला येथील दाट वस्तीच्या ठिकाणी असलेल्या फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला. शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटात संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली आहे. भीषण स्फोटानंतर फॅक्टरीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कल्याणी पोलीस स्टेशन आणि अग्निशमन दलाच्या विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, फॅक्टरीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. स्फोट झाल्यानंतर फॅक्टरीची भिंत कोसळली आहे. स्फोटात बचावलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. फॅक्टरीत नेमका स्फोट कशामुळे झाला, याचा तपास सुरु करण्यात आला आहे.