बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडी यांच्यावतीने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार असून यासाठी हुतात्मा स्मारक येथे सत्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्रातील तमाम पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात सीमा प्रश्नाचा उल्लेख करण्याची मागणी केली होती. पण या मागणीला म्हणावे तसे कोणत्याही पक्षाने प्रतिसाद दिला नाही. तरीदेखील चंदगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्न सोडवणुकीचा उल्लेख केला होता. तसेच निवडणुका जिंकल्यानंतर देखील आमदारकिची शपथ घेताना त्यांनी सीमावासियांचा उल्लेख करत विधानसभेमध्ये शपथ घेतली होती. त्यामुळेच त्यांच्या या आपुलकीचा सन्मान करण्याच्या हेतूने बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडी यांनी त्यांचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय घेतला. तरी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व घटक समित्या आणि संलग्न संघटना व सीमाभागातील तमाम मराठी जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व युवा आघाडी अध्यक्ष राजू किणेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.