Sunday , July 26 2026
Breaking News

पोलीस आयुक्तांसह ११ अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची वाल्मीकी समाजाची मागणी

Spread the love

 

बेळगाव : बंगळूरु येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी बंगळूरुचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह ११ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सरकारच्या आदेशाचा निषेध करत आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाल्मीकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली.

बंगळूरु चेंगराचेंगरीच्या घटनेची नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारण्याऐवजी, ती पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी बोलताना, वाल्मीकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला. ते म्हणाले की, “बंगळूरुमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह ११ अधिकाऱ्यांना निलंबित करणे निंदनीय आहे. पोलिसांनी आपली नैतिक जबाबदारी पूर्ण केली आहे. सरकारने त्वरित निलंबनाचा आदेश रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. बाळप्पा तळवार यांनीही याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “बी. दयानंद आणि राजशेखर यांनी आपल्या प्रामाणिक सेवेसाठी राष्ट्रस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत, ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना निलंबित करून मानसिकदृष्ट्या खचवून टाकण्यात आले आहे. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर सरकारने अन्याय करू नये.”

यावेळी संजय नायक, पांडुरंग नायक, अशोक नायक, बाळू तळवार, एस. एस. नाईकर, कुमार तडीहाळ, सुनील सनके, नागेंद्र नायक, हूवाप्पा कल्लूर यांच्यासह अनेक वाल्मीकी समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *