बेळगाव : बँकॉक येथे झालेल्या बँकॉक इंटरनॅशनल सुपर कप 2025 बारा वर्षाखालील मुलांच्या निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या एमएसडीएफ फुटबॉल स्पर्धेने नेत्रदिपक कामगिरी करताना स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात एमएसडीएफ फुटबॉल संघाने बारसा फुटबॉल क्लब सिंगापूर संघाचा 2-1 असा पराभव केला. यावेळी एम एस डी एफ संघातर्फे आराध्य नाकाडी व समर्थ हिरेमठ यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले. दुसऱ्या सामन्यात एम एस डी एफ संघाने बीएसए बँकॉक संघाचा 2-1 असा पराभव केला यावेळी समर्थ हिरेमत व चैतन्य नाईक यांनी प्रत्येकी 1 गोल केले. तिसऱ्या सामन्यात एम एस डी एफ संघाने सी यु अकॅडमी थायलंड संघावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. यावेळी एम एस डी एफ संघातर्फे हुसेन जमादार याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना 3 तर आराध्य नाकाडी याने 2 गोल नोंदविले. उपांत्यपूर्व सामन्यात एम एस डी एफ संघाने व्हिएतनाम फुटबॉल क्लब संघाचा 2-1 असा पराभव केला. यावेळी हुसेन जमादार व रायान सय्यद यांनी प्रत्येकी 1 गोल करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी खेळविण्यात आलेल्या उपांत सामन्यात एम एस डी एफ संघाने एनजीओ फुटबॉल क्लब संघावर 2-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. यावेळी समर्थ हिरेमठ व हुसेन जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या अंतिम सामन्यात एम एस डी एफ संघाला थायलंडच्या पी नाईन फुटबॉल अकॅडमीकडून 0-1 असा निसटता पराभव पत्करावा लागला व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या आंतरराष्ट्रीय सुपर कप फुटबॉल स्पर्धेतील उपविजेत्या बेळगावच्या एम एस डी एफ संघाला प्रमुख प्रशिक्षक मानस नायक व ज्येष्ठ प्रशिक्षक रविशंकर मालशेठ यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळत असून पालक वर्गाचे प्रोत्साहन मिळत आहे. पुस्तकांमध्ये अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एम एस टी एफ फुटबॉल संघाला आकर्षक उपविजेतेपदाचा चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच संघातील सर्व खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.