ताब्यात घेऊन पाठविले सीबीआय कोठडीत
बंगळूर : धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येतील आरोपी माजी मंत्री आणि आमदार विनय कुलकर्णी आज न्यायालयाला शरण आले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला होता आणि त्यांना एका आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
या संदर्भात, ते लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात हजर झाले असता त्याना सीबीआय कोठडीत पाठवण्याचा आदेश जारी करण्यात आला. १५ जून २०१६ रोजी, धारवाड तालुक्यातील हेब्बळ्ळी मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांची त्यांच्या मालकीच्या जिममध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करत सीबीआयने ५ नोव्हेंबर २०२० रोजी माजी मंत्री आणि सध्याचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच या प्रकरणात विनय कुलकर्णी यांचा जामीन रद्द केला होता.
सेवा ही लोकांच्या मनात
अलीकडेच, धारवाडजवळील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथील एका पर्यटन स्थळावर पत्रकार परिषद घेऊन विनय कुलकर्णी म्हणाले, “मी इतक्या वर्षांपासून मतदारसंघासाठी केलेले काम आणि सेवा लोकांच्या मनात आहे. म्हणूनच मी मतदारसंघाबाहेर असूनही आमदार आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी मतदारसंघाबाहेर असलो तरी लोक मला भेटण्यासाठी आतुर असतात. खटल्यातील जामीन रद्द झाल्यामुळे मला अडचण आली असेल. तथापि, मतदारसंघाच्या विकासात अडथळा येऊ नये याची काळजी घेतल्याचे त्यांनी भावनिक होऊन सांगितले.