सुनील देसाई : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सांगता
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजना विभागातून कार्य कार्यक्षम विद्यार्थी घडविण्याचे प्रक्रिया या विभागातून केली जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विभागाच्या माध्यमातून होतो. कलागुणांचा विकास होऊन विद्यार्थी समाज उपयोगी कार्य करण्यास उद्युक्त होतो, असे मत अर्जुनी येथील उपसरपंच सुनील देसाई यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना सांगता समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
देसाई म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर अर्जुनी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून गावकऱ्यांचे प्रबोधन केले. जल संवर्धनाचा संदेश दिला तसेच या सात दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेने पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत जल बंधारा उभा केला. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या प्रसंगी विविध प्रकारची बौद्धिक व्याख्याने अर्जुनी येथे आयोजित करण्यात आली होती.
अरविंद पाटील यांचे दुग्ध व्यवसाय झाला जीवनाचा आधार हा शेतकऱ्यांना अत्यंत चांगली माहिती देणारा व डोळस बनवणारा व्याख्यानाचा विषय होता. त्याचा गावकऱ्यांनी मनमुराद आनंद घेतला विलास देसाई यांनी चुकून पडल्या गाठी… हसूच आले ओठी या व्याख्यानातून समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य केले. प्रा.कांचन बिरनाळे यांनी महिला व प्रसारमाध्यमे यावर महिला वर्गांचे प्रबोधन केले. सुभाष पाटील यांनी बदलती कुटुंब व्यवस्था यावर आपले परखड मत व्यक्त केले. बदलणाऱ्या कुटुंब व्यवस्थे पाठीमागची कारणे नमूद केली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध प्रकारच्या गटच्या आयोजित करण्यात आल्या व त्यातून समाज उपयोगी व व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात माहिती देण्यात आली. या गट चर्चेचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते. अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना सजग बनवण्याचे काम शिबिराच्या माध्यमातून झाले.
सरपंच वर्षा सुतार यांनी, विद्यार्थ्यांनी पुढे येऊन समाजाचे नेतृत्व करणे गरजेचे आहे आणि हे नेतृत्व गुण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतात त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे मत व्यक्त केले. शबाजीराव चौगुले यांनी, विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची कौशल्य आत्मसात करावीत व आपले जीवन सुंदर बनवावे असे मत व्यक्त केले.
प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. राहुल घटेकरी यांनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक भविष्यात कुशल पद्धतीने आपले जीवन व्यक्त करतील व त्यांच्या जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचा निश्चितच फायदा होईल अशी ग्वाही दिली.
इंद्रजीत कापडे, सोनाली शेलार, समीक्षा परीट, दिव्या कांबळे यांनीमनोगत व्यक्त केले.
सुदाम देसाई यांनी स्वागत केले. बाजीराव चौगुले यांनी आभार मानले. यावेळी स्वयंसेवक विद्यार्थी गावकरी उपस्थित होते.