वसंत हंकारे : दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण
निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपली जबाबदारी कळाली पाहिजे. मुला- मुलींनी आई-वडिलांचा विश्वास जपावा त्यांना विश्वासात घेऊन, प्रत्येकाने आई वडिलांच्या अपेक्षा पुर्तीसाठी जगावे. त्यांच्या सुखासाठी जीवाचे रान करावे, असे मत प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष भाई शाह तर प्रमुख पाहुणे म्हणून गडिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद मगर हे उपस्थित होते.
हंकारे म्हणाले, पूर्वी शिक्षक व विद्यार्थी हे नाते आईवडिलांसारखे होते. ते आजच्या युगातही जपले पाहिजे. शाळेत आहात तोपर्यंत ज्ञानाचा कण कण व क्षण क्षण जगा, शाळेतील आठवणी आपल्याला जगण्यासाठी ऊर्जा देतात. शाळेच्या भिंती आपल्याला मैत्री, निष्ठा, संघर्ष, कर्तव्य शिकवतात. ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे ते यशाचे शिखर गाठत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावावरून बोलताना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह म्हणाले, पालकांनी आपल्या पाल्याची तुलना इतरांसोबत करून विद्यार्थ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण करू नये. प्रत्येकाने सुसंस्कारित होण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी झटावे आपल्या वर्तनातील बदल हे उद्याच्या भारतातील इष्ट बदल ठरावेत.
मुख्याध्यापक बी. एस. जाधव यांनी शाळेने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा चढता आलेख वर्णन करून सांगितला
प्रमुख पाहुण्यांची ओळख आर. डी. देसाई यांनी करून दिली. व्यासपीठावर मयुरी मगर मुख्याध्यापक बी. एस. जाधव, एस. बी. पाटील, एस. एम. गोडबोले, आर. एस. भोसले, आर. डी. देसाई, आर. डी. पाटील,शिक्षक प्रतिनिधी एस. एस. सांडगे, कर्मचारी प्रतिनिधी एस. एच. कांबळे, समीर मुजावर, वैष्णवी माने, यश सकट, अपूर्वा दबडे, श्रीनाथ कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यु एम. सातपुते यांनी सूत्रसंचलन केले. एस. व्ही. पाटील यांनी आभार मानले.