राजू पोवार; ढोणेवाडी शाखेचा वर्धापनदिन
निपाणी (वार्ता) : उस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रति टन ५५०० रुपये दर मिळावा. पुढील काळात न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची आहे, असे मत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या ढोणेवाडी शाखेच्या दुसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने होत्या.
पोवार म्हणाले, सोयाबीन, ऊसाला योग्य दर मिळावा, यासाठी रयत संघटनेने आतापर्यंत मंत्री महोदयांसह जिल्हाधिकारी, तलाठी तहसीलदारांना निवेदने दिली आहेत.पण याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. कर्नाटकासह सीमाभागातील महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी तीन हजार जाहीर होणारा दर अमान्य आहे. गत हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये द्यावा. शिवाय कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्रातील कारखान्यांनी प्रति टन ३२०० ते ३४०० रुपये दर देत आहेत. त्यामानाने कर्नाटकातील कारखान्यांनीही दर द्यावा. बेळगाव जिल्हा दुष्काळी घोषित करूनही आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज आणि व्याज माफ करून उतारा कोरा करावा,अशी रयत संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी आहे. हा दर मिळावा यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यास सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बबन जामदार, एकनाथ सादळकर, विजय माळी, सागर हावले, सुरेश चैगुले, सचिन पाटील, सुभाष खोत, राजु कोपार्डे, विठ्ठल माळी- महराज, दादासो हिररीकुडे, बाबासो सुर्यवंशी, दता घाटगे, प्रकाश घाटगे, बाबासो निगवे, रमेश निगवे, शितल सुर्यवंशी, राजु घाटगे, सागर माळी, ढोणेवाडी यांच्यासह शाखेचे पदाधिकारी व शेतकारी उपस्थित होते.