निपाणी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपले सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बहुजन समाजात शैक्षणिक विकास व्हावा यासाठी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेने देवाळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथे देवाळे विद्यालय सुरू केले याच विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करीत देवाळे ग्रामवासीयाच्या सुखदुःखात रमणारे, देवाळेवासीयाचे आवडते गुरुजी, सर म्हणजे निपाणीचे सुपुत्र विष्णुपंत मच्छिंद्रनाथ चिकोडे यांच्या जयंती दिनी, देवाळे विद्यालयाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे श्री. योगेश चिकोडे व योगीता चिकोडे (भोपळे) यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ देवाळे विद्यालयास 61 हजार रुपयाचा धनादेश प्राचार्य एन. बी. नलवडे यांच्याकडे देणगी दाखल सुपूर्द केला. या देवाळे विद्यालयाने व गुरुजनानी आपल्याला घडविले त्यांना वंदन करून योगेश्वर चिकोडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमाबद्दल शिक्षण संस्थेसह देवाळे ग्रामस्थांनी श्रीमती सावित्री विष्णूपंत चिकोडे, श्री. योगेश्वर, सौ. योगिता चिकोडे (भोपळे) व कुटुंबियांचे अभिनंदन करुन धन्यवाद दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.