


बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; शासकीय विश्रामधामात बैठक
निपाणी (वार्ता) : मतदार यादी परीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्यांना हे फॉर्म मिळाले आहेत त्यांनी शनिवार (ता.८) पर्यंत संबंधित बीएलओकडे देणे आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म दिल्यास तो ग्राह्य मानला जाणार नसल्याची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. येथील शासकीय विश्रामधामात सोमवारी (ता.३) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, निपाणी मतदारसंघात २ लाख ३४ हजार ५५९ मतदारांपैकी २३ हजार १० मतदारांनी फॉर्म भरून दिलेले नाहीत. त्यापैकी ६ हजार ९७९ मतदार मयत, ११ हजार १६९ मतदार स्थलांतरित असून त्यांचा शोध लागलेला नाही. ३ हजार ६५३ बोगस, इतर २३ हजार १० फॉर्म येणे बाकी आहेत. बीएलओकडे जमा केलेल्या फॉर्म पैकी ९०१ अर्जांचे डिजिटलायजेशन शिल्लक आहे.
यादीमधील २३ हजार भारतामधील चुकीची दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तहसीलदार आणि बी एल ओ ना सूचना देऊन २० हजार अर्जांची दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदार संघात २४८ भूत असून त्यामध्ये आता वाढ होणार आहे. मानकापूर, बेनाडी, बोरगाव येथील भूत मध्ये बदल होणार आहे. एकूण ११ बुथची नावे बदलणार आहेत. ए आर ओ कविता वारंगल, तहसीलदार सुरेश मुंजे यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि मतदारांच्या सहकार्यामुळे ९० टक्के कामकाज झाले आहे. ८ ऑगस्ट नंतर कच्च्या यादीची प्रिंट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर पुन्हा महिनाभर दुरुस्तीचे काम चालू राहणार असल्याचे चिंगळे यांनी सांगितले.
बैठकीस चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बसवराज पाटील, अण्णासाहेब हवले, दीपक सावंत, आर. के. धनगर, नरसू गोटखिंडे, राजू कोपर्डे, अमित जाधव, बाळासाहेब कमते, शितल बुडके, प्रकाश मालगावे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta