


शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; पहाटे साडेतीन वाजताची घटना
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरवेस वरील आंदोलन नगर शेजारी असलेल्या हॉटेल सार्थक गार्डनला शुक्रवारी पहाटे (ता.९) अचानक आग लागून सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, हेस्कॉमचे अधिकारी अक्षय चौगुला आणि बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार व सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

याबाबत घटनास्थळावरून समजलेले अधिक माहिती अशी, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन नगर शेजारी दोन वर्षांपूर्वी हॉटेल सार्थक सुरू करण्यात आले होते. हॉटेल चालक केतन बोरगावे हे नेहमीप्रमाणे रात्री साडेअकरा वाजता सुमारास हॉटेल बंद करून घरी गेले होते. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता अचानक हॉटेलला आग लागली. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती केतन बोरगावे यांना दिली. त्यानंतर त्यांनी येथील अग्निशमन दलाला कळविली. तात्काळ अग्निशामक जवानांनी वाहनासह घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हॉटेलमधील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते.
या आगीमध्ये हॉटेलमधील संगणक, मॉनेटर, प्रिंटर, काउंटर,१६ सीसीटीव्ही कॅमेरे, साऊंड सिस्टिम, २० पंखे, ४० हजाराची रोख रक्कम,३०० लिटर चे फ्रिज, हॉटेलमधील महत्त्वाची कागदपत्रे, १५ हजार रुपयाचे आईस्क्रीम, २० हजार रुपयांच्या पाण्याच्या बाटल्या, १५ हजार रुपयाचे कोल्ड्रिंक्स, हॉटेलचे दरवाजे जळून खाक झाले आहेत. बसवेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta