


एसएसएलसी व द्वितीय पीयूसीच्या परीक्षा फेब्रुवारी ते मेदरम्यान; हरकती नोंदविण्यास २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत
बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने (केएसईएबी) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षांच्या पहिल्या व दुसऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकावर हरकती किंवा सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मंडळाने राज्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना संभाव्य वेळापत्रक सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक
द्वितीय पीयूसी परीक्षा-१ : २७ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२७
एसएसएलसी परीक्षा-१ : २२ मार्च ते ५ एप्रिल २०२७
द्वितीय पीयूसी परीक्षा-२ : ३ ते १५ मे २०२७
एसएसएलसी परीक्षा-२ : २४ ते ३१ मे २०२७
परीक्षांच्या वेळा
द्वितीय पीयूसीच्या बहुतांश प्रमुख विषयांच्या परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होतील. माहिती तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीसारख्या व्यावसायिक विषयांच्या परीक्षा सकाळी १० ते दुपारी १२.१५ या वेळेत घेतल्या जातील.
एसएसएलसीच्या प्रथम भाषा आणि प्रमुख विषयांच्या परीक्षा सकाळी १० ते दुपारी १.१५ या वेळेत होतील. यामध्ये उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी तीन तास आणि प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त १५ मिनिटे दिली जातील. द्वितीय व तृतीय भाषा विषयांच्या परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत, तर एनएसक्यूएफ विषयांच्या परीक्षा सकाळी १० ते दुपारी १२.१५ या वेळेत होतील.
दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. तीन तासांच्या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना ६० मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळेल.
हरकतींसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत
संभाव्य वेळापत्रकाबाबत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना काही हरकती किंवा सूचना असल्यास ८ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ई-मेलद्वारे सादर करता येतील.
एसएसएलसी परीक्षांसाठी : dpikseab@gmail.com
द्वितीय पीयूसी परीक्षांसाठी : directorpuekseab@gmail.com
२२ ऑक्टोबरनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संभाव्य वेळापत्रक तपासून निर्धारित मुदतीत सूचना सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta