


विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : सार्वजनिक मंडळातर्फे आकर्षक विद्युत रोषणाई
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात रविवारी (ता.११)घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी मोठ्या अंबा माता व दुर्गा मातेच्या प्रतिष्ठापनेषस विद्युत रोषणाई केली आहे. शहर व ग्रामीण भागात ७४ ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. अनेक मंडळांनी दुर्गा माता मूर्तींची पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूका काढून प्रतिष्ठापना केली आहे. बिरदेवनगर, पंतनगर, शिवाजीनगर, साखरवाडी, सटवाई रोड, दत्तगल्ली, कामगार चौक, चव्हाणवाडी, खोतगल्ली प्रगतीनगर, आंदोलननगर, साईशंकरनगर, शिरगुप्पी रोड भागात मंडप उभारणी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
येथील नवदुर्गा तरुण मंडळाच्या दुर्गामाता मूर्तीची पारंपारिक वाद्यांच्या गजरात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय जरग, माजी नगरसेवक शौकत मणेर, विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे, दिलीप पठाडे, दत्ता नाईक, विनायक वडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर सरकार राजवाडा आणि रविवार पेठ येथील निपाणी निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची दररोज
विविध रुपात पूजा मांडली जाणार आहे. शिवाजीनगर येथील अंबाबाई मंदिरात देवीची रोज पूजा मांडून नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगतीनगर येथील शुभकार्य मित्र मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर, बिरदेव नगर व पंतनगर येथे दुर्गा माता व आंबा मातेची प्रतिष्ठापना करून दांडिया नृत्य आयोजित केले आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गांधी चौकातील व्यंकटेश मंदिरात दररोज सायंकाळी ६ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. विवेक सोलापूरकर यांनी दिली. ११ रोजी सायंकाळी विष्णू सहस्त्रनाम, सोमवारी (ता.१२) र गजानन बुवा काने -उगार यांचे किर्तन, शुक्रवारी (ता.१६ ) महालक्ष्मी महिला भजनी मंडळ- इचलकरंजी यांचे भजन, शनिवारी(ता. १७ ) नटराज नृत्य कला केंद्र यांच्या विद्यार्थिनींचे भरतनाट्यम, रविवारी (ता.१८) ओवी ते सिनेगीत हा सांगीतिक कार्यक्रम, सोमवारी (ता.१९) रोजी तायक्वांदो प्रात्यक्षिक, मंगळवारी (ता.२० ) कल्याण महोत्सव असे कार्यक्रम होणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta