


निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संस्थेचे सन २०२५ ते २०२७-२८ या सालाकरिता कर्जाची पत मंजुरीस जिल्हा बँकेकडून वारंवार मागणी करूनही पत रोखून धरण्यात आली आहे. त्यासाठी संस्थेकडून १४ जुलै २०२५ ला आवश्यक कागदपत्रकासह क्रमवार पत्रके दाखल केली आहेत. संबंधित अधिकाऱ्याकडूनही तपासणी होऊनही मंजुरी पत्र देण्यास चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे सभासदांनी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आक्रोश मोर्चा करण्याचा निर्धार सभासदांनी बैठकीत व्यक्त केला आहे.
बैठकीतील माहिती अशी, सभासदांच्या कर्जाच्या पत मंजुरीसाठी वेळोवेळी संस्थेकडून पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटीद्वारे पत्रक मंजुरीस विनंती करण्यात आली. पण त्यास आजतागायत मंजुरी मिळालेली नाही. यामुळे सध्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये नवीन १०४ सभासद शेतकरी आर्थिक सहाय्य पीक कर्जापासून वंचित राहिलेले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून शेती कामांमसह बियाणे खाते व विविध विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी पीकेपीएस संघाकडे अर्जाद्वारे जिल्हा मध्यवर्ती बँकेस २२ रोजी घेराओ घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. या घेराओमध्ये अकोळ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सभासद सहभागी होणार आहेत. तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने याची गांभीर दखल घेऊन पत्रकास मंजुरी देऊन या दुष्काळी परिस्थितीत सभासद शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष पद्मराज पाटील व संचालकांनी केली आहे. बैठकीस उपाध्यक्षा निर्मला भोई, शर्मिला कागे, विवेकानंद सोळांकुरे, युवराज पाटील, रावसाहेब मुधाळे, सुनील मगदूम, महेश मलाबादे, श्रीकांत बन्ने, अनिल कोळी, भोपाल म्हेत्री, कार्यदर्शी विमलनाथ पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta