मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून (3 जानेवारी 2023) सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. शुभमन गिलची आतापर्यंत कामगिरी अल्लेखनीय ठरलीय. तसेच आता तो टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठीही सज्ज झालाय. शुममन गिलनं भारताच्या अनेक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे. भारताचा तडाखेबाज फलंदाज हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ज्यात शुभमन गिलला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. शुभमन गिलनं 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.
शुभमन गिलचं आतापर्यंतचं प्रदर्शन
शुभमन गिलनं आतापर्यंत 15 एकदिवसीय आणि 25 कसोटी सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 687 धावांची नोंद आहे. ज्यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 130 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीनं 736 धावा केल्या आहेत.