Saturday , February 8 2025
Breaking News

किंग कोहलीचे ‘विराट’ शतक; भारताचा लंकेवर ६७ धावांनी दणदणीत विजय

Spread the love

 

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला मंगळवारी (१० जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. भारताने विराट कोहली आणि उमरान मलिकच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर तब्बल ६७ धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला. विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५वे शतक पूर्ण करत भारतीय संघाला ३७३ एवढी मोठी धावसंख्या उभारून दिली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७३वे शतक ठरले. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने अखेरपर्यंत संघर्ष केला. उमरान मलिकने ३ आणि सिराजने २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडो व कुसल मेंडिसला बाद केले. सलामीवीर पथूम निसंका आणि चरिथ असलंका यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु उमरान मलिकच्या वेगासमोर तेही नतमस्तक झाले. चरिथ असलंका २३ धावांवर उमरानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. उमरानने आजच्या सामन्यात १५६ किमी वेगाने चेंडू टाकला अन् एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. निसंका व धनंजया डी सिल्वा ही जोडी भारतावर वरचढ ठरत होती. निसंकाने अर्धशतक झळकावताना ७२ धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने आपला अनुभव वापरत धनंजयला (४७) बाद केले. उमरानच्या वेगवान गोलंदाजीवर फटका मारण्याचा निसंकाचा प्रयत्न अपयशी ठरला अन् त्याचा अक्षर पटेलने सोपा झेल घेतला. निसंका ८० चेंडूंत ११ चौकारांसह ७२ धावांवर बाद झाला.
वानिंदू हसरंगाने फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार अशा धावा कुटल्या. पण, चहलने गुगली टाकून वानिंदूला आणखी एक उंच फटका मारण्यास भाग पाडले. श्रेयस अय्यर व उमरान झेल टिपण्यासाठी समोरासमोर आले, परंतु अय्यरने चेंडूवर नजर कायम राखताना झेल घेतला. वानिंदू ७ चेंडूंत १६ धावा करून माघारी परतला. त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला अन् भारताने विजय मिळवला. कर्णधार दासुन शनाकाने संघर्ष दाखवताना झुंजार शतक पूर्ण केले. परंतु श्रीलंकेला हार मानावी लागली. त्यांनी ८ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारली. शनाकाने ८८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०८ धावा केल्या.
तत्पूर्वी, श्रीलंकेच्या दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांना तो खूप महागात पडला. विराट कोहलीच्या शतकाने अक्षरशः पाहुण्या संघाला दिवसा तारे दाखवले. रोहित शर्मा व विराट कोहली यांचे संघातील पुनरागमन आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतातच होणाऱ्या या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी भारताची आजपासून खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यातील सुरुवात झाली. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची दमदार भागीदारी करताना संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे शतक थोडक्यात हुकले, परंतु त्याने विश्वविक्रमासह अनेक विक्रम मोडले. या सामन्यासाठी भारताने जेव्हा अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली, तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मागील एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या इशान किशनला बाकावर बसवून शुबमन गिलला संधी देण्यात आली. यावरून सोशल मीडियावर वादाला सुरूवात झाली. गिलला का घेतले असा प्रश्न चाहत्यांनी विचारला, मात्र गिलनेही त्यांना नाराज न करता जबरदस्त सुरूवात करत अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने मोठा विक्रमही नोंदवला.
केएल राहुलला ४१ व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर रजिथाने त्रिफळाचीत केले. राहुलने २९ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारत ३९ धावा केल्या. विराट कोहली आणि केएल राहुलच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ३०० धावांचा पल्ला गाठला. यादरम्यान अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. ३० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डिसिल्वाने श्रेयस अय्यरला झेलबाद केले. श्रेयसने २४ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत २८ धावा केल्या. ४५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रजिथाने हार्दिकला झेलबाद केले. हार्दिकने १२ चेंडूत १ षटकार लगावत १४ धावा केल्या. ४९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रजिथाला कोहलीला बाद करण्यात यश मिळाले. कोहलीने ८७ चेंडूत १ षटकार आणि १२ चौकार मारत ११३ धावा केल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बस्स आता खूप…’; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला

Spread the love  सिडनी : भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना गमावला. मेलबर्न सामन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *