बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला ३१ मे रोजी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रज्वल रेवण्णावर कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राइव्हही बाहेर आल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन केलेली आहे.
आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, प्रज्वल रेवण्णा एसआयटीला तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णा हा एसआयटीच्या प्रश्नांना टाळत असून तपासात सहकार्य करत नाही, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिले आहे. एसआयटीचे पथक आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज किंवा सोमवारी घटनास्थळी नेवून तपास करण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, प्रज्वल रेवण्णाला अटक केल्यानंतर न्यायालयाने ६ जून पर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रज्वल रेवण्णाने एसआयटीच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं दिली. तसंच हा माझ्याविरुद्ध कट रचला असून आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं प्रज्वल रेवण्णाचं म्हणणं आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रज्वल रेवण्णाच्या आईचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिलांनी चौकशी केली असता त्या त्यांना तेथे मिळून आल्या नाहीत. त्यामुळे आता भवानी रेवन्ना यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी चौकशी टाळली तर एसआयटीकडून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.