
विरोधी पक्ष नेत्याच्या वक्तव्यावर सिध्दरामय्यांनी फटकारले
बंगळूर : मुख्यमंत्रीपद आणि केपीसीसी अध्यक्षपदाच्या बदलावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याच्या मुद्द्यावरील पडदा आज हटवल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या कितीकाळ मुख्यमंत्रीपदावर रहातील, सांगता येत नाही, या विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या बोलण्यावर त्यांनी पुढील पाचवर्षेही मीच मुख्यमंत्री राहीन असे बोलून त्यांनी अशोक यांना फटकारले.
आज, जेव्हा भाजप आमदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये विरोध केला, तेव्हा विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, सिद्धरामय्या या पदावर किती काळ रहाणार माहित नाही, असे बोलून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावर सिद्धरामय्या म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करीन आणि पुढील पाच वर्षेही मीच मुख्यमंत्री असेन.
सिद्धरामय्या यांच्या बोलण्याने भाजप आमदार गप्प झाले. मात्र, काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावर डी. के. शिवकुमार गट कसा प्रतिसाद देईल हे पाहणे बाकी आहे.
नेतृत्व हस्तांतरणाच्या बाबतीत हाय कमांडच्या निर्णयाला ते वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बऱ्याच काळापासून सांगत आहेत. तथापि, आता, विधानसभेत, त्यांनी पुढील ५ वर्षे मुख्यमंत्री राहतील असे म्हटले आहे. यामुळे सिद्धरामय्या यांच्या गटातील सदस्यांना प्रचंड बळ मिळाले आहे. याद्वारे डी. के. शिवकुमार गटाला सिद्धरामय्या यांनी चेकमेट दिल्याचा अर्थ काढण्यात येत आहे. मात्र डी. के. शिवकुमार यांचे समर्थक आणखी संतप्त होण्याची शक्यता आहे.
तसे पहाता मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे हे वक्तव्य भाजप नेत्यांच्या बोलण्यावर त्यांना खिजविण्यासाठी होते. मात्र त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta