सोलापूर : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण (जि. विजापूर) येथील शाखेत मंगळवारी सायंकाळी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील काही रक्कम व सोने कर्नाटक पोलिसांच्या हाती लागले आहे. दरोडेखोरांच्या मोटारीतून जप्त केलेली रक्कम व सोन्याची किंमत किती, हे स्पष्ट झाले नाही.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात खळबळ उडाली आहे. लष्करी गणवेशातील दरोडेखोरांनी अवघ्या वीस मिनिटांत कोट्यवधीचे सोने व रोख रक्कम लुटली. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंतीजवळ दरोडेखोरांनी वापरलेली मोटार मिळून आली. तेथील सीमाभागातील गावांमध्ये पोलिस कसून चौकशी करत आहेत. बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी एका मोटारीतून चडचण येथून हुलजंती गावाकडे पलायन केले. त्यांच्या मोटारीने रस्त्यावरील काही दुचाकींनाही धडक दिली. हुलजंती येथे त्यांनी रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र गावभागातील रस्ता बंद असल्याने त्यांना मोटार थांबवावी लागली. दरोडेखोरांनी काही सोने आणि रोकड घेऊन पायीच पळ काढला. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मंगळवेढ्याच्या दिशेने पलायन केले. दरम्यान, काही नागरिकांनी पोलिसांना तत्काळ याची माहिती दिली.
मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास विजयपूर येथील पोलिस अधीक्षक, चडचण पोलिस ठाण्याचे निरीक्षक, मंगळवेढा पोलिस ठाण्याचे दत्तात्रय बोरीगिड्डे, उपनिरीक्षक विजय पिसे, यांच्यासह मोठा फौजफाटा हुलजंती येथे दाखल झाला. पोलिसांनी संशयस्पद मोटारीचा पंचनामा केला. मोटारीत काही सोने, रोख रक्कम, डीव्हीआर मिळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta