न्यायालयाचे सरकारला निर्देश; ५ वी, ८ वी परीक्षेची पुढील सुनावणी आज
बंगळूर : उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्यानंतर पुढील सुनावणी उद्या (ता. १५) दुपारी चार वाजेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली.
राज्य अभ्यासक्रमाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठात आज पुन्हा सुनावणी सुरू झाली. पुढील सुनावणी उद्या (ता. १५) दुपारी चार वाजता होणार आहे.
न्यायमुर्ती नरेंद्र आणि न्यायमुर्ती अशोक किनगी यांच्या न्यायपीठात हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. कुस्माच्या वतीने अधिवक्ता के. व्ही. धनंजया युक्तिवाद करत आहेत, तर सरकारच्या वतीने एएजी ध्यान चिन्नाप्पा युक्तिवाद करत आहेत.
मार्च १३ पासून सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय मूल्यांकन (बोर्ड) परीक्षांना तात्पुरते स्थगिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारला दिले होते. यानंतर शिक्षण विभागाने परीक्षा पुढे ढकलल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, न्यायालयाने परवानगी दिल्यास येत्या काही दिवसांत मूल्यमापन परीक्षा घेण्याची तारीख जाहीर करण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे.
न्यायालयाने राज्य सरकारचा इयत्ता पाचवी आणि आठवी बोर्डाच्या परीक्षेचा आदेश रद्दबातल ठरवला होता. विनाअनुदानित शाळांच्या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय जाहीर केला. न्यायमूर्ती प्रदीपसिंह येरूर यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश काढला. याद्वारे पाचवी व आठवीच्या मुलांची सार्वजनिक परीक्षेची चिंता दूर झाली आहे. सध्या सरकारच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे, प्रतीक्षा करावी लागेल आणि उद्या (ता. १५) न्यायालय काय निर्णय देणार हे पाहावे लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta