बेळगाव : कर्नाटकाच्या सीमेवरील 865 गावांतील लोकांना महाराष्ट्र सरकारतर्फे आरोग्य सुविधा देण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय निषेधार्ह असून, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानाजवळ प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कर्नाटकाच्या सीमाभागातील लोकांना आरोग्य कवच देणे हा अक्षम्य अपराध आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कसल्याही प्रकारे प्रक्षोभक कृत्ये, विधाने करू नयेत असे निर्देश देण्यात आले होते. त्याचे उल्लंघन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी केले आहे. आम्हीही असे निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्र हद्दीतील तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींनी त्यांना महाराष्ट्राकडून न्याय मिळत नाही म्हणून कर्नाटकात समाविष्ट करण्याचे ठराव केले आहेत. याचे भान ठेवून त्यांनी जबाबदारीने वागावं असा इशारा देऊन महाराष्ट्राच्या त्या निर्णयाचा मी निषेध करतो असे बोम्मई यांनी सांगितले. राज्यातील केपीटीसीएल, हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी वेतनात सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यांच्याशी आमच्या मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी २-३ दिवस दीर्घ चर्चा केली आहे. त्यांना मी २० टक्के वेतनवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत आज आदेश जारी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे परिवहन विभागाच्या संपकरी कर्मचाऱ्यांशी परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू याची चर्चा केली आहे. कर्मचाऱ्यांनी १५ टक्के वेतनवाढ देण्याची मागणी केली होती. ती देण्यास मी मंजुरी दिली आहे. याबाबतही आज आदेश काढण्यात येईल असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta