मुख्यमंत्री सिध्दरामय्या; ईश्वरप्पांच्या वादग्रस्त वक्तव्यावर इशारा
बंगळूर : राज्यातील ४० टक्के कमिशनच्या आरोपावरून पुन्हा गदारोळ होत आहे. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केम्पण्णा यांनी मागील भाजप सरकारवर ४० टक्के कमिशनचा आरोप केला होता. आता त्यांनी काँग्रेस सरकारवरही असेच आरोप केले आहेत. मात्र मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी अशा आरोपाची कागदपत्रे किंवा पुरावे असल्यास त्यांनी द्यावेत, असे सांगितले.
दरम्यान, देशाच्या फाळणीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना मारण्यासाठी कायदा आणला पाहिजे, या ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त करून कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी संकेत दिले.
केम्पण्णा यांच्या आरोपाबाबत चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्गाच्या भगीरथ मठात आज पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, केम्पण्णा यांनी सरकारवर ४० टक्के कमिशनचा आरोप केल्यामुळे नागमोहन दास आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यांनी या संदर्भात पुरावे असतील तरते सादर करावेत.
४० टक्के भ्रष्टाचार असेल तर रेकॉर्ड देऊ द्या, अधिकारी चौकशी करतील. हवे तर अशा लोकांविरुद्ध त्यांनी आयोगाकडे तक्रार करावी, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, अनुदानाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार नाही. हा आमच्यावर अन्याय आहे हे खरे आहे.आम्ही १०० रुपये कर भरला तर फक्त 12 रुपये मिळतात. उर्वरित ८८ रुपये केंद्राकडे जातात. जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेंव्हा कर आमच्या राज्याचा. आम्ही स्वतः वसूल करू. असे मोदी म्हणाले होते. आता करातील आमचा वाटा मागितला तर देशाच्या फाळणीची मागणी करीत असल्याचा कांगावा त्यांनी सुरू केला आहे.
मोदीच देशाचे तुकडे करू इच्छितात का, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी ‘कन्नडीग म्हणून तुम्हाला राग येतनाही का?’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खासदारांना चिमटा काढला.
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘भद्रा अप्पर बँक’ प्रकल्पासाठी पाच हजार ३०० कोटी रुपयाची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात एक रुपयाही दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. मी पाटबंधारे मंत्र्यांनाही या संदर्भात विचारले आहे,’ असे ते म्हणाले.
भाजपकडे नैतिकता नाही – रेड्डी
आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार नाही. भाजपकडे आमच्याबद्दल बोलण्याची नैतिकता नाही. बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वात भ्रष्टाचारी होते. असे सरकार माझ्या आयुष्यात पाहिले नाही, असे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले. प्रियांक खर्गे यांनीही कॉंग्रेस सरकारमध्ये कमिशन घेतले जात असल्याचा आरोप फेटाळून लावला. केंपण्णा यांच्याकडे याबाबत कागदपत्रे असल्यास आयोगाकडे दाखल करावित, असे त्यांनी सांगितले.
ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई
देशाच्या फाळणीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना मारण्यासाठी कायदा आणला पाहिजे या ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही ईश्वरप्पा यांच्यावर कारवाई करू. कटकारस्थान, मारामारी या भाषेशिवाय भाजप काहीही करू शकत नाही. ते म्हणतात मी आरएसएसचे प्रशिक्षण घेतले आहे. हेच प्रशिक्षण घेतलात का ईश्वरप्पा? असा सवाल त्यांनी केला.