बेंगळुरू : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारताच प्रशासनाला वेग देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मंत्रालयात सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात सर्व विभागांच्या सचिवांचा आढावा घेत विभागनिहाय प्रलंबित कामांची यादी तयार करण्यास सांगितले. ही सर्व कामे २५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याची मुदत अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
बैठकीत बोलताना त्यांनी प्रशासनात कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दबावाला बळी न पडता पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याचे निर्देश देत, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, प्रत्येक विभागाने पुढील १५ दिवसांत कृती आराखडा तयार करून सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी गुन्हेगारी, ड्रग्ज माफिया आणि जुगाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
सरकारने जाहीर केलेल्या सहा प्रमुख कल्याणकारी योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला. प्रशासनात सकारात्मक बदल घडवून राज्यासाठी नवा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करताना, आर्थिक शिस्त राखून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta