Monday , September 21 2026
Breaking News

सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून संगीत प्रशिक्षक विनायक मोरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एम्. बी. नरसन्नवर होते. मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. मराठी विषयाच्या प्रा. कल्पना धामणेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना विनायक मोरे म्हणाले, श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण ‘कुसुमाग्रज’ या नावाने ओळखतो, त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण कुसुमाग्रजांचे साहित्य हे मानवी भावनांचे, क्रांतीचे आणि सामाजिक न्यायाचे प्रतिबिंब आहे. मराठी साहित्यातील त्यांचे अतुलनीय योगदान आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य यांचा गौरव करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा केवळ एक दिनविशेष नसून, तो मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी स्वतःला वाहून घेण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. मराठी साहित्यातील समृद्धता, तिचे सौंदर्य आणि भाषिक विविधता नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे या दिनाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.
३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ घोषित केला. अभिजात दर्जा मिळाला तरी खऱ्या अर्थाने भाषेचा गौरव तेव्हाच होईल जेव्हा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात तिचा सन्मानाने वापर करू आणि संवर्धन करू, असे सांगून शेवटी ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे सुरेश भट यांचे मराठी अभिमान गीत सादर करून मोरे यांनी समारोप केला.
त्यानंतर अनुराधा शिंदोळकर हिने सुंदर नृत्य प्रस्तुत केले. सृष्टी धामणेकर यांनी पोवाडा सादर केला. कुलदीप सावंत व सृष्टी हसनेकर यांनी कविता सादर केल्या. रुचिरा नाईक, बेबी सहर, अंजना एन्. यांनी आपली मनोगते मांडली. निकिता चौगुले आणि निकिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *