Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना कर्नाटकातील सोयी सुविधांचा उपलब्ध करुन द्या; माजी आमदार विक्रम सावंत

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या कन्नड भाषिक नागरिकांच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे होते. कर्नाटक राज्याचे सीमा समन्वय मंत्री एच. के. पाटील यांच्या आदेशावरून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे 23 वर्षानंतर जिल्हा प्रशासनाने सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक प्रतिनिधींशी संवाद साधत प्रलंबित मागण्यांवर बैठकी चर्चा करण्यात आली. त्यावेळी सीमा भागातील कन्नडीगांच्या प्रमुख 24 मागण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यात कन्नड माध्यमातून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कर्नाटकातील शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के समांतर आरक्षण देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जत आणि अक्कलकोट सारख्या दुष्काळी भागात पाणी प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून सोडवण्याबाबत प्रतिनिधींनी आग्रही मागणी केली. तुबची बबलेश्वर सारख्या सिंचन प्रकल्पांचा विस्तार करून सीमावर्ती गावांना पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटक शासनाकडून अधिक सोयी सुविधा आणि विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती बस सवलत आणि मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत देखील सरकारकडून सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवरील पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचा विकास, बस सेवा आदी बाबी जिल्हा प्रशासनाच्या अधिकारात असल्याने त्या तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल परंतु आरक्षण, जातीचे दाखले आणि नवीन शैक्षणिक धोरणाबाबतचे निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने या बैठकीत सविस्तर अहवाल तयार करून तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकी चर्चेसाठी पाठवण्यात येईल.

महाराष्ट्राचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी यावेळी भूमिका मांडताना सांगितले की, सीमाभागात राहणाऱ्या कन्नड भाषिकांना कर्नाटक राज्यातील सोयी सुविधांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकचे 865 गावांना महाराष्ट्राच्या योजनांचा लाभ दिला जातो त्याचप्रमाणे सीमा भागातील कन्नड भाषिकांना देखील कर्नाटक सरकारकडून लाभ देण्यात यावा असे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्राचे माजी आमदार विक्रम सावंत, बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे विविध शासकीय अधिकारी आणि सीमा भागातील कन्नड भाषिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीमाभागात शांतता आणि सलोखा राखत विकासात्मक प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *