Monday , May 25 2026
Breaking News

आगामी गणेशोत्सवासाठी पंधरा फुटांपर्यंतच्या मूर्तीची मर्यादा; पोलिस प्रशासनाकडून निर्बंध

Spread the love

 

 

बेळगाव : दरवर्षी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. उंच मूर्तींमुळे विसर्जनावेळी अडचणी निर्माण होत असल्याने प्रशासनाने यंदा आगाऊ निर्णय घेत सर्व गणेशमूर्ती १५ फुटांपेक्षा कमी उंचीच्या ठेवाव्यात, अशी सूचना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली.

सामान्यतः मंडळांकडून गणेशमूर्तींची उंची तीन-चार महिने आधीच निश्चित केली जाते. त्यामुळे यंदा सहा महिने आधीच हा निर्णय जाहीर करून नियोजन सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांचे पदाधिकारी, महामंडळाचे प्रतिनिधी आणि मूर्तिकार यांची बैठक पार पडली. या बैठकीत उंच मूर्तींमुळे विसर्जन प्रक्रियेला विलंब होत असल्याचे निदर्शनास आले. काहीवेळा मिरवणुका ३६ तासांपर्यंत लांबत असल्याने प्रशासनावर ताण वाढतो. उंची मर्यादित ठेवल्यास विसर्जन वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त एन. व्ही. बरमनी यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू होणे महत्त्वाचे आहे. मूर्तीची सुंदरता उंचीत नसून भक्तीत असते, असे सांगत त्यांनी वेळेचे नियोजन करण्यावर भर दिला.

बैठकीत मूर्तिकार संजय किल्लेकर, विनायक पाटील यांनी आपली भूमिका मांडली. तसेच महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, विजय जाधव, नेताजी जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही सूचना केल्या. शहरातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण मंडळांच्या प्रवेशावरही निर्बंध
गणेशमूर्तींची उंची शहराबरोबरच ग्रामीण भागातही वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागात विसर्जनाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे काही मंडळे शहरात विसर्जनासाठी येतात. मागील वर्षी हिंडलगा, पिरनवाडी, कंग्राळी परिसरातील काही मंडळांनी कपिलेश्वर येथे विसर्जन केले होते, ज्यामुळे मोठा विलंब झाला. यामुळे यंदा ग्रामीण भागातील मंडळांना शहरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

पोलीस आयुक्तांनी मंडळांना केलेल्या विविध सूचना :
* गणेशमूर्ती १५ फुटांपेक्षा लहान असावी
* डीजे लावण्यावर निर्बंध
* विसर्जन मिरवणुकीला वेळेत सुरुवात करा
* विसर्जनावेळी मोठे डेकोरेशन नसावे
* नवीन मंडळांना परवानगी मिळणार नाही
* ग्रामीण भागातील मंडळांना शहरात येण्यास निर्बंध

About Belgaum Varta

Check Also

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे दि. 27 रोजी राष्ट्रीय सत्संग आणि संस्कार अभियान

Spread the love  बेळगांव : श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास आणि बाल विकास केंद्र, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *