Sunday , July 26 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी समितीचे निष्ठावंत प्रकाश मरगाळे यांची अभिनंदनीय निवड सर्वानुमते करण्यात आली.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. बैठकीच्या सुरुवातीला रणजीत चव्हाण पाटील यांनी दुखवट्याचा ठराव मांडला. यामध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ साहित्यिक जयसिंगराव पवार, बाळासाहेब कुपेकर या दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बैठकीदरम्यान सीमाप्रश्नी बेळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे सुरू केलेल्या एक लाख सह्यांच्या मोहिमेस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठिंबा व्यक्त करण्यात आला आणि घटक समित्यांनी सह्यांची मोहीम तीव्र करावी असे देखील यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले.
नुकताच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. याला आबासाहेब दळवी यांनी अनुमोदन दिले तर माजी नगरसेवक नेताजी जाधव, रामचंद्र मोदगेकर, रणजीत चव्हाण पाटील, बी. डी. मोहनगेकर, नारायण सांगावकर, रावजी पाटील, मनोहर हुंदरे आदींनी पाठिंबा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
या निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले की, मी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येयधोरणाची बांधील राहून सीमा प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहीन. त्याचप्रमाणे मराठी पत्रकार संघाने हाती घेतलेल्या एक लाख सह्यांच्या मोहिमेत सर्वतोपरी मदत करून ही मोहीम यशस्वी करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच नजीकच्या काळात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हा प्रशासनावर भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच त्या संदर्भात मध्यवर्तीची बैठक घेऊन घटक समित्यांची याबाबत चर्चा करून तारीख ठरविण्यात येईल, असे देखील नूतन अध्यक्ष प्रकाश मरगळे यांनी बोलताना सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *