Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव महाराष्ट्राच्या अस्मितेचे धगधगते हृदय : प्रा. सुनीलकुमार लवटे

Spread the love

बेळगाव : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी सीमाभागातील मराठी माणूस आजही संघर्ष करत असून बेळगाव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि शब्दगंध कविमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम शनिवारी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. प्रदीप पाटील आणि प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविकातून अकादमीच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि प्रा. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रा. लवटे यांनी भाषणात सांगितले की, भाषा संपली तर संस्कृतीही संपते. त्यामुळे मराठी भाषा जपणे ही काळाची गरज आहे. साहित्य आणि कलेच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम अकादमी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. राजारामबापू पाटील यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी प्रा. अशोक चौसाळकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासाचा उल्लेख केला. तर डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राजारामबापू पाटील यांना समाजहितासाठी झटणारे लोकनेते म्हणून गौरविले.

कार्यक्रमात कवयित्री सिसिलिया कारव्हालो यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, ॲड. राजाभाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र, गोवा आणि सीमाभागातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त मान्यवर

प्रा. सुनीलकुमार लवटे यांना एक लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कविता, कथा, समीक्षा आणि मराठी भाषेच्या अभ्यासासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठी भाषेच्या प्रसारासाठी कार्य करणारे अनंत कदम यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *