Sunday , July 26 2026
Breaking News

धोकादायक बडेकोळ्ळमठ वळण दुरुस्तीसाठी एनएचएआयकडून 3 कोटी मंजूर

Spread the love

बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-48) बागेवाडी घाटातील बडेकोळ्ळमठ वळण अखेर दुरुस्त होणार असून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सतत होणारे अपघात आणि नागरिकांच्या वाढत्या चिंतेनंतर ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे.

बेळगावपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेले हे वळण पावसाळ्यात विशेषतः अत्यंत धोकादायक ठरत आहे. गेल्या काही वर्षांत येथे 18 हून अधिक प्राणघातक अपघात घडल्याने हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाऊ लागला होता.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सातत्याने एनएचएआयकडे पाठपुरावा केला. त्यानंतर केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) येथील सिव्हिल अभियांत्रिकी विभागाच्या तज्ज्ञांकडून तांत्रिक पाहणी करण्यात आली.

प्रा. अर्चना शगोटी, सोमनाथ खोड आणि कार्तिक कुलकर्णी यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत वळणाच्या रचनेत गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार ताशी 80 किमी वेगासाठी आवश्यक असलेली वळणाची त्रिज्या येथे अपुरी असल्याचे निदर्शनास आले. तसेच रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 11 मीटरवरून थेट 9.5 मीटरपर्यंत कमी होत असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे.

तज्ज्ञांच्या अहवालानुसार अतिवेग, लेन शिस्तीचा अभाव आणि घाटातील तीव्र उतार-चढाव ही अपघातांची मुख्य कारणे आहेत. विशेषतः पावसाळ्यात वाहनांवरील नियंत्रण सुटण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, एनएचएआयने आता या वळणाची पुनर्रचना, रस्त्याची भूमिती सुधारणा आणि वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. या कामामुळे भविष्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *