Sunday , July 26 2026
Breaking News

७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी बैठक संपन्न

Spread the love

डी.बी. पाटील कार्यालयात नियोजन बैठक, तीन सत्रांची रूपरेषा जाहीर

बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन-२०२६ येत्या २४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे.

या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी व कार्यकारिणीतील सदस्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी बेळगाव जिल्हा महिला व पुरुष कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच डी. बी. पाटील कार्यालयात घेण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील होते. त्यांनी उपस्थित सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यांना संमेलन यशस्वी करण्याकरता जबाबदाऱ्या व नियोजनासंदर्भात सविस्तर सूचना दिल्या. “हे संमेलन सीमाभागातील मराठी अस्मितेचा हुंकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ती आपली वैयक्तिक जबाबदारी समजून काम करावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तीन सत्रांत रंगणार साहित्य सोहळा
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषविणार आहेत. दुसऱ्या सत्रात पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे ‘काळजातल्या कविता – आई व बाप’ या विषयावर आपल्या सुरेल आवाजात गेयता काव्य मैफल सादर करणार आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी दिली.

बैठकीत उपस्थित सर्व महिला व पुरुष सदस्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले. स्वागत समिती, प्रसिद्धी समिती, मंडप व्यवस्था, पाहुण्यांचे आदरातिथ्य, भोजन व्यवस्था अशा विविध समित्यांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, खजिनदार एम. वाय. घाडी, शिवसंत संजय मोरे, रणजीत चौगुले, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, स्मिता किल्लेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सलग सातव्या वर्षी होणारे हे साहित्य संमेलन सीमाभागातील मराठी साहित्यप्रेमींसाठी यंदाही पर्वणी ठरणार असून तयारीला वेग आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *