Monday , May 25 2026
Breaking News

ऑनलाइन फार्मसी बंद करण्याची बीडीआरपीएची सरकारकडे मागणी

Spread the love

 

बेळगाव : सरकारने ऑनलाइन फार्मसी बंद कराव्यात या मागणीसाठी बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशन (बीडीआरपीए) तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट ऑर्गनायझेशनतर्फे आज बुधवारी सरकारने ऑनलाईन फार्मसी बंद कराव्यात या मागणीसाठी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्याला पाठिंबा देणाऱ्या बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज गुरुवारी सकाळी अध्यक्ष बंडू सदलगे, सेक्रेटरी सुधीर नंजन्नावर, उपाध्यक्ष पवन देसाई आदींच्या नेतृत्वाखाली आपल्या दंडावर काळ्याफिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

यावेळी बंद करो बंद करो ऑनलाइन फार्मसी बंद करो, अशी घोषणा देत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. किरकोळ फार्मसींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. औषधांची ऑनलाइन विक्री, कॉर्पोरेट साखळी फार्मसी दुकानांकडून ग्राहकांना मोठ्या सवलती देऊन आकर्षित करणे आणि बोगस डॉक्टरांना थेट मोठ्या प्रमाणात औषधांचा पुरवठा या कारणांमुळे राज्य व देशभरात अनेक किरकोळ दुकाने बंद पडत आहेत.

बनावट औषधांची विक्रीमुळे तरुण पिढी आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होत असून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सवय लावणाऱ्या औषधांची सहज उपलब्धता, ही एक चिंतेची बाब आहे यासाठीच आम्ही ऑनलाइन औषध विक्रीच्या तीव्र विरोधात आहोत.

यामुळे पारंपरिक किरकोळ फार्मसींचे अस्तित्व धोक्यात येण्याची आणि रुग्णांना थेट औषधे विकणाऱ्या डॉक्टरांकडून जीएसटी चुकवल्यामुळे आपल्या सरकारच्या महसुलाचे नुकसान होण्याची भीती आहे. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन आमचे मुद्दे लवकरात लवकर राज्य सरकारकडे मांडावेत आणि या अनैतिक प्रथा थांबवाव्यात, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बेळगाव लाईव्हशी बोलताना बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल फार्मसी असोसिएशनचे पदाधिकारी महेश अनगोळकर यांनी सांगितले की, ऑनलाइन फार्मसी पद्धत पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण त्यामुळे किरकोळ फार्मसी त्याला कामावर मोठा अन्याय होत आहे. ऑनलाइन फार्मसीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्याला कोणती औषधे मिळाली आहे ते देखील कळत नाही. यासाठीच ऑनलाइन फार्मसी च्या विरोधात आम्ही सर्व किरकोळ फार्मसी विक्रेत्यांनी आज बंद पुकारला आहे.

तथापि हा बंद आमचे दुकान बंद न करता हाताच्या दंडावर काळ्या फिति बांधून आणि शर्टावर बॅच लावून निषेध नोंदवण्याच्या स्वरूपात असणार आहे. तेव्हा सरकारने आमच्या विरोधाची दखल घेऊन ऑनलाइन फार्मसी पद्धत तात्काळ बंद करावी त्याचप्रमाणे डॉक्टरांना जो थेट औषध पुरवठा केला जातो तो देखील बंद करावा.

पूर्वी औषध दुकान जास्त नसल्यामुळे परिस्थितीनुसार ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1945 शेड्युल के अंतर्गत डॉक्टर्सना औषध विकण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र आता पावला पावलावर व दुर्गम खेड्यात सुद्धा औषध दुकाने असल्यामुळे डॉक्टरांना थेट औषध पुरवठा करण्याचा नियम देखील सरकारने रद्द केला पाहिजे, असे महेश अनगोळकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात प्रथमच पावसाळी अधिवेशनाची शक्यता; प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधीमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन प्रथमच बेळगावातील सुवर्णसौध येथे भरविण्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *