केंद्र सरकारने “ज्ञान भारतम्” योजनेअंतर्गत दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी विविध संस्थांना, मठांना, विद्यापीठांना तसेच खासगी संग्राहाकांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. खानापूरातील मराठी साहित्याचे जाणते अभ्यासक व म. ए. समितीचे दिवंगत नेते कै. उदयसिंग दत्ताजीराव सरदेसाई यांनी आपल्या आवडीतून गोळा केलेल्या त्यांच्या खासगी संग्रहामध्ये मराठी भाषेतील अत्यंत मौल्यवान व अनेक वर्षे जपलेली हस्तलिखिते सुस्थितीत असून त्यात ज्ञानेश्वरी, महाभारत तसेच अन्य धार्मिक व सांस्कृतिक ग्रंथांच्या प्रतींचा समावेश आहे. हा दुर्मिळ ठेवा त्यांचे चिरंजीव श्री अभिजित सरदेसाई यांनी व्यवस्थित जतन करून ठेवला आहे. स्थानिक अभ्यासकांना लवकरच हा संग्रह प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
विद्यापीठांनी, इतिहास संशोधन मंडळांनी, विविध संस्थांनी तसेच जाणकारांनी व अभ्यासकांनी कष्टाने मेहनतीने पिढ्यान् पिढ्या जपलेल्या अशा हस्तलिखित ग्रंथांमुळे साहित्य, धर्म, परंपरा आणि लोकभाषा असा सांस्कृतिक वारसा व त्याचे महत्व अधोरेखित होऊन जनमानसात टिकून रहिले आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात चीनी प्रवासी हुएन् त्संग या ज्ञानपिपासू बौद्ध भिक्कुने भारतातून साडे सहाशे हस्तलिखिते मायदेशी नेली आणि तेथे भारतीय भाषा, संस्कृती व तत्वज्ञानाची ओळख प्रसृत केली. नंतरच्या अनेक परकिय राजवटिंच्या काळात मौल्यवान असे ग्रंथ एकतर नष्ट झाले किंवा परदेशी नेले गेले. ते ग्रंथ आपल्याला दुर्मीळ झाले आणि भारतीय लोक त्यातील बहुमोल अशा माहितीला कायमचे मुकले, हि वस्तुस्थिती आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तींमुळे देशभरात असंख्य दुर्लक्षित हस्तलिखिते कालौघात नष्ट झाली, गहाळ झाली.
आताशा केवळ धार्मिक संस्था, मठ, विद्यापीठे, वाचनालये, संग्रहालये किंवा खासगी संग्राहाकांकडे मात्र असे ग्रंथ आहेत. भविष्यात असे ग्रंथ, हस्तलिखिते पूर्णतः दुर्लभ होतील या जाणिवेमुळे त्यांचे संवर्धन होणे गरजेचे वाटते. इंग्लंड देशातील ब्रिटिश लायब्ररीने डिजिटायझेशनची मोहिम हाती घेऊन देशोदेशीचे कैक दुर्मिळ ग्रंथ यापूर्वीच डिजिटाईज केले आहेत. यात भारतातील ग्रंथांचाही समावेश आहे. तसेच भारतातील अनेक विद्यापीठांनी आपल्याकडील ग्रंथ डिजिटाइज केले. उस्मानिया विद्यापीठ यात आघाडीवर होते. महाराष्ट्रात पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ व पुराभिलेखागारातील कागदपत्रे आता डिजिटाइज होत आहेत.
प्राचीन ग्रंथांचे संवर्धन व डिजिटायझेशनसाठी केंद्र सरकारच्या पुढाकारामुळे अशा ऐतिहासिक व धार्मिक वारशाच्या संरक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. या योजनेत ताम्रपट, भूर्जपत्र, ताडपत्र व कागदावर लिहिलेल्या हस्तलिखितांचा समावेश असणार आहे. “ज्ञान भारतम्” योजनेमुळे दुर्मिळ हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहतील, तसेच संशोधक, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींनाही हे ग्रंथ सहज उपलब्ध होतील असे मत अभिजित सरदेसाई यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्याकडील ग्रंथांचे डिजिटायझेशन् व्हावे म्हणून संबंधित खात्याशी संपर्क केला आहे.
स्थानिक पातळीवर खानापूरातील बहुसंख्य लोकांना यापूर्वी सरदेसाई यांचेकडील संग्रहाबद्द्ल फारशी माहिती नसल्याने अनेकांना आता कुतूहल व कौतूक वाटत असून त्याबाबत अभिमान व्यक्त केला जात आहे. हा छोठासा ठेवा येथील सांस्कृतिक संपत्तीचा महत्त्वाचा भाग ठरणारा आहे, अशी प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खानापूरात इतरांकडेही असा संग्रह असण्याची शक्यता आहे. ज्या कुणाजवळ असा संग्रस आहे त्यांनी पुढे येऊन तो डिजिटायझेशन् करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta