बेळगाव : वाढत्या नागरीकरणामुळे सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेली हिरवाई पुन्हा फुलविण्यासाठी वन विभागाने यंदा प्रथमच जपानी ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात तब्बल दोन लाख रोपे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, घनदाट वनक्षेत्र उभारण्यासाठी प्रति एकर 14 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
वन विभाग, महापालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहभागातून व्यापक वृक्षारोपण करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
महापालिका क्षेत्रात 20 हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय बेळगाव, निपाणी, गोकाक, बैलहोंगल, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यांमध्ये मिळून 40 हजार रोपे लावली जाणार आहेत. ग्रामपंचायत व नगरपंचायत स्तरावर 30 हजार, तर ग्रामीण भागात तब्बल 1 लाख 50 हजार रोपांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
काय आहे ‘मियावाकी’ पद्धत?
जपानचे पर्यावरणतज्ज्ञ अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेली ही पद्धत कमी जागेत आणि कमी कालावधीत घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या तंत्रामध्ये स्थानिक प्रजातींची विविध उंचीची झाडे, झुडपे आणि वनस्पती एकत्रितपणे लावली जातात. त्यामुळे झाडांची वाढ नैसर्गिक जंगलांच्या तुलनेत अनेकपटींनी वेगाने होते आणि अल्प क्षेत्रात दाट हरित पट्टा निर्माण होतो.
पर्यावरण संवर्धनाला चालना
शहरीकरणामुळे कमी होत चाललेले हरित क्षेत्र, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता वन विभागाचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. जैवविविधतेचे संवर्धन, तापमान नियंत्रण आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ‘मियावाकी’ पद्धतीची जंगले प्रभावी ठरत असल्याने बेळगावच्या हरित भविष्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta