Monday , September 21 2026
Breaking News

विद्यार्थ्यांना मोफत बस पास; सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही लाभ

Spread the love

 

बेळगाव : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येणार आहेत. परिवहन खात्याने शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.

या योजनेअंतर्गत राज्यातील शाळा, महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे परराज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे कर्नाटकातील विद्यार्थी तसेच सीमाभागात राहून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमधून कर्नाटकात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थिनींसह सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करत परिवहन खात्याने आता सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

या योजनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक मोफत बस पासधारक विद्यार्थ्याला अपघात विमा संरक्षणही देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति विद्यार्थी पाच रुपयांचा विमा प्रीमियम राज्य सरकार भरणार आहे. तसेच प्रत्येक बस पासमागे शंभर रुपये प्रक्रिया शुल्क परिवहन महामंडळांना देण्यात येणार आहे. अपघात नुकसानभरपाई निधी आणि प्रशासकीय खर्चासाठी सरकारकडून चारही परिवहन महामंडळांना एकूण १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यासाठी शैक्षणिक पात्रता, प्रवासाचे अंतर आणि बस पासचा कालावधी यासंदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे. इच्छुक विद्यार्थी राज्य सरकारच्या ‘सेवा सिंधू’ पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाइन अर्ज करू शकतील.

मार्गदर्शक सूचनांनुसार, कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळासह राज्यातील चारही परिवहन महामंडळांच्या बसेसमधून विद्यार्थी आपल्या शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत मोफत प्रवास करू शकणार आहेत. तसेच यापूर्वी शुल्क भरून बस पास घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची भरलेली रक्कम परत करण्यात येणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *