Wednesday , July 29 2026
Breaking News

सीमा ठरावावरून नव्या चर्चेला तोंड; “बेळगाव कर्नाटकातच, मग स्वतंत्र ठरावाची गरज काय?” : खासदार जगदीश शेट्टर

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या बाजूने सीमा ठराव मंजूर करण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादात आता बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असताना महापालिकेत स्वतंत्र ठराव मांडण्याची गरजच काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टर म्हणाले की, बेळगावमध्ये मराठी, कन्नड तसेच इतर भाषिक नागरिक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. विविध समाजघटकांच्या सहकार्यामुळे शहराचा विकास होत असून अनावश्यक वाद निर्माण करण्यापेक्षा विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे आहे.

दरम्यान, कन्नड संघटनांनी महापालिकेत कर्नाटकाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागविल्याने या विषयाला अधिकच राजकीय रंग चढला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शेट्टर म्हणाले की, “बेळगावमध्ये दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन भरते. यावरूनच बेळगाव कर्नाटकाचा भाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सीमा प्रश्नावर स्वतंत्र ठराव मंजूर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

महापालिकेत ठराव मंजूर झाला नाही तर राज्य सरकार महापालिका बरखास्त करेल, अशी चर्चा सुरू असली तरी त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे शेट्टर यांनी स्पष्ट केले. “असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी त्यांनी कळसा-भंडुरी प्रकल्पाचाही उल्लेख केला. विधानसभेत दोनदा ठराव मंजूर होऊनही त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे केवळ ठराव मंजूर करून प्रश्न सुटत नसतात, असे सांगत त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर अधिक भर देण्याचे आवाहन केले.

महापालिकेतील सीमा ठरावाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असताना खासदार शेट्टर यांच्या या वक्तव्यामुळे वादाला नवे वळण मिळाले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस; सतीश जारकीहोळींच्या हालचालींनी राजकीय चर्चेला उधाण

Spread the love    बेळगाव : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *