Sunday , September 20 2026
Breaking News

गुरू – शिष्य नाते : आत्मोन्नतीचा शाश्वत मार्ग

Spread the love

 

जगात अनेक कला, विद्या आणि शास्त्रे आहेत. त्या शिकविणारे गुरू, शिक्षक आणि प्राचार्य शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मिळतात. या विद्यांमुळे माणसाला उपजीविका, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखाची साधने प्राप्त होतात. परंतु भौतिक सुखाची साधने मिळाली म्हणजे मानसिक समाधान मिळतेच असे नाही. अधिकाधिक सुखाच्या शोधात माणूस धावत राहतो; पण अंतःकरणातील शांती, समाधान आणि आनंद यांचा शोध अपूर्णच राहतो.

याच कारणामुळे अनेक जण विविध मार्गांचा अवलंब करतात. काही जण खऱ्या सद्गुरूंच्या शोधात निघतात, तर काही ढोंगी गुरूंच्या आहारी जाऊन मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान करून घेतात. संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वीच अशा ढोंगी गुरूंवर कठोर शब्दांत टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जो स्वतःच्या आचरणाने पवित्र नाही, तो इतरांना अध्यात्माचा मार्ग दाखवू शकत नाही.

म्हणूनच प्रश्न पडतो की, गुरू करावा का? उत्तर निश्चित आहे—होय; पण तो सद्गुरू असावा. जो केवळ मंत्र देत नाही, तर जीवन जगण्याची दिशा देतो; जो ज्ञान, विवेक आणि आत्मानुभवाचा मार्ग दाखवतो, तोच सद्गुरू.

संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात –

“गुरु हा संतकुळीचा राजा । गुरु हा प्राणविसावा माझा ।
गुरुवीण देव दुजा । पाहतां नाही त्रिलोकी ॥”

सद्गुरू हा शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करणारा ज्ञानसूर्य असतो. सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी अध्यात्मविद्या तोच शिकवितो. ही राजविद्या केवळ शब्दांचे ज्ञान नसून अनुभवाचे ज्ञान आहे.

सद्गुरू आणि शिष्य यांचे नाते हे सुपीक जमीन आणि उत्तम बियाण्यासारखे असते. उत्तम पीक यावे यासाठी दोन्हींची गुणवत्ता आवश्यक असते. त्याचप्रमाणे योग्य सद्गुरू आणि पात्र शिष्य यांचा संगम झाला तर जीवनात आनंद, समाधान आणि आत्मोन्नतीचे भरघोस पीक येते. मात्र या पिकाचे अहंकार, मत्सर आणि स्वार्थापासून संरक्षण करावे लागते. सातत्याने साधना, चिंतन आणि नामस्मरण केल्याने हे पीक कायम टिकते.

ज्ञानेश्वर माऊली म्हणतात –

“श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ॥”

सद्गुरू हा शिष्याचा खरा पाठीराखा असतो. तो केवळ संसारासाठी नव्हे तर परमार्थासाठीही आवश्यक असलेले ज्ञान देतो. त्याच्या कृपेने जीवनाला दिशा मिळते आणि आत्मोद्धाराचा मार्ग खुला होतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात –

“सद्गुरू वाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी.”

येथील “पाय धरणे” म्हणजे केवळ शारीरिक वंदन नव्हे; तर त्यांनी दिलेल्या नामाचा, साधनेचा आणि तत्त्वज्ञानाचा स्वीकार करणे होय. सर्व गुरू नाम देतात; परंतु सद्गुरू त्या नामामागील ज्ञान देतात. ज्ञानयुक्त नाम म्हणजेच “सबीज नाम”. अशा नामस्मरणामुळे साधकाच्या जीवनात शांतता, समाधान आणि आत्मिक आनंद निर्माण होतो.

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी नामस्मरणाबरोबरच “विश्वप्रार्थना” दिली. तिच्यामागे सर्वांच्या कल्याणाचा व्यापक विचार आहे-

“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.”

या विश्वकल्याणाच्या भावनेतून त्यांनी “जीवनविद्या” तत्त्वज्ञान दिले. हे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांना संस्कार देते, युवकांना यशाचा मार्ग दाखवते, कुटुंबात सौहार्द निर्माण करते आणि साधकाला आत्मज्ञानाच्या दिशेने प्रवास घडवते.

खरा सद्गुरू शिष्याकडून धन, मान किंवा प्रसिद्धीची अपेक्षा करत नाही. त्याची खरी गुरुदक्षिणा म्हणजे शिष्याने ज्ञानाचा अभ्यास करावा, चिंतन-मनन करावे आणि स्वतःसह कुटुंब, समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी ते ज्ञान आचरणात आणावे.

याच अर्थाने गुरू-शिष्य नाते हे केवळ ज्ञान देण्या-घेण्याचे नाते नसून, आत्मोन्नती, संस्कार आणि विश्वकल्याणाचा शाश्वत सेतू आहे.

– श्री. विठ्ठल बाबुराव घाडी
कवी, लेखक, पत्रलेखक
चारकोप, कांदिवली, मुंबई

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक दिन विशेष : शाळाच घर अन् मेंडिलकरच कुटुंब; १३ वर्षांपासून ज्ञानदानाची अविरत सेवा

Spread the love  अतिथी शिक्षक नामदेव अनगोळकर यांची दुर्गम भागातील शिक्षणसेवा; गावकऱ्यांचे निस्वार्थ प्रेम हाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *