
विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांची रिक्षा वर्दी; महिन्याला दहा हजारांचा खर्च स्वतःच्या खिशातून
– राधिका सांबरेकर यांजकडून
‘गुरुविना कोण दाखवील वाट?’ असे म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो त्यांच्या स्वप्नांचा मार्गदर्शक, पालक आणि आधारवडही असतो. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम जसे कुंभार करतो, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे कार्य शिक्षक करतात. म्हणूनच शिक्षक हे विद्यार्थी रूपी रथाचे खरे सारथी आहेत.
शाळेचे स्वरूप बदलले, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या; मात्र अनेक सरकारी शाळांमध्ये आजही शिक्षकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित राहिलेली नाही. विद्यार्थी शाळेत यावा, शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावा आणि त्याचा शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी शिक्षक स्वतः पालकाची भूमिका बजावत आहेत. याचे जिवंत उदाहरण टिळकवाडी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक मुला-मुलींची शाळा क्रमांक ९ येथे पाहायला मिळते.
सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या ही चिंतेची बाब असताना, विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी या शाळेतील शिक्षकांनी अनोखा पुढाकार घेतला आहे. ‘वाहन तुमच्या दारी, तुम्ही शाळेच्या द्वारी’ या भावनेतून शिक्षकांनी स्वतःच्या पगारातून विद्यार्थ्यांसाठी रिक्षाची वर्दी सुरू केली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे किंवा दूरच्या अंतरामुळे शाळेत येण्यास अडचण निर्माण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची वाट अधिक सुकर झाली आहे.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यांना सहशिक्षकांनीही मनापासून साथ दिली. विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे, शिकावे आणि शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील एकमेव निर्मळ हेतू आहे.
टिळकवाडी, जैतनमाळ, पार्वतीनगर, भवानीनगर, चौगुलेवाडी, पापामळा आदी परिसरातून विद्यार्थी या शाळेत येतात. यातील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेली आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्य अर्थार्जनासाठी धडपडत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे अपेक्षित लक्ष देणे अनेकदा शक्य होत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घेत रिक्षाची व्यवस्था केली आहे.
विशेष म्हणजे रिक्षातून शाळेत जाण्याची ही संकल्पना विद्यार्थ्यांनाही चांगलीच आवडली आहे. त्यामुळे मुले उत्साहाने आणि न चुकता दररोज शाळेत येत असल्याचे शिक्षक सांगतात. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाची जबाबदारीही शिक्षकांनी स्वीकारली आहे.
या उपक्रमासाठी प्रभारी मुख्याध्यापक सतीश पाटील, तसेच सहशिक्षिका संगीता कुलकर्णी, राजश्री वराळे आणि वर्षा लंगरकांडे हे चार शिक्षक दरमहा प्रत्येकी अडीच हजार रुपये खर्च करतात. म्हणजेच विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी दरमहा सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च शिक्षक स्वतःच्या पगारातून करतात.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या या सेवाभावाचे विशेष कौतुक करावे लागेल. ज्ञानदान करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहेच; परंतु विद्यार्थ्यांनी शाळेची पायरी चढावी यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांना शाळेच्या दारी आणणे, ही त्यापुढची निःस्वार्थ सेवा आहे.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाबरोबरच त्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर करणारे हे शिक्षक खऱ्या अर्थाने ‘विद्यार्थी रूपी रथाचे सारथी’ ठरले आहेत. शिक्षक दिनी अशा सेवाभावी शिक्षकांना मनापासून सलाम!

Belgaum Varta Belgaum Varta